Monday, 11 March 2013

तिला माहेर नाही,
तिला सासरही नाही,
तिला फक्त घर आहे.
तिची किंमत नसेल कुणाला कदाचित,
पण तिच्या प्रत्येक तासाला दर आहे.

तिच्या घराला एक खिडकी आहे,
ज्यातून उन्हाला प्रवेश नाही.
फक्त चांदण्याचं स्वागत असतं.
रात्रीच्या प्रकाशात तिचं घर उजळून निघतं.
त्या उजेडात दिसतोय एक पलंग,
ज्यावर मखमली चादर आहे.

घरात एक जेवणाचा ओटा आहे,
एक स्टोव, एक पातेलं, चारपाच डबे,
एक आरसा,दोरीवर काही साड्याचोळ्या,
आणि भिंतीवर एक गाठोडं , पण ज्यात दागिने नसावेत,
कारण सर्व दागिने तिच्या अंगभरच आहेत,
ज्यावर फक्त एक पारदर्शक पदर आहे.

मी जरा सहानुभूतीने विचारता,
म्हणाली कुणी लिहिणारा बिहिणारा असशील तर चालता हो,
माझा वेळ वाया घालवू नकोस.
तू पण माझ्यासारखं गिर्हाईक शोधत राहशील ....... माझ्यासारखाच.
तुझ लिहून संपेल पण,
माझं हे न संपणारं दैनंदिन सदर आहे.

.........अमोल

No comments:

Post a Comment